JNVST 2027 Class 6 Admission

महाराष्ट्रातील पालकांसाठी तारखा, पात्रता, EVS अभ्यासक्रम आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती

महत्त्वाची सूचना (Disclaimer): या लेखातील माहिती नवोदय विद्यालय समितीच्या 2026 / 2027 च्या अधिकृत माहितीपत्रकातून शक्य तितक्या अचूकपणे संकलित करण्याचा आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केला आहे. माहिती देताना पूर्ण काळजी घेतली असली, तरी यात काही त्रुटी असू शकतात. तसेच, प्रवेश प्रक्रियेच्या नियमात किंवा तारखांमध्ये समितीकडून कधीही बदल होऊ शकतो. त्यामुळे कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्वांत अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी नेहमी अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in तपासावी.

तारीख: 07-जुलै-2026

महत्त्वाच्या अधिकृत लिंक्स:

झटपट सारांश

अर्ज सुरू: 07 जुलै 2026

शेवटची तारीख: 31 जुलै 2026

परीक्षा: 28 नोव्हेंबर 2026

मोठा बदल: EVS समाविष्ट, Waiting List नाही

जर तुमच्या पाल्याला इयत्ता 6 वी साठी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवायचा असेल, तर JNVST 2027 ची प्रक्रिया आधीपेक्षा अधिक काटेकोर झाली आहे. अर्जाची अंतिम तारीख, रहिवासी जिल्ह्याचा नियम, कागदपत्रांची पडताळणी, EVS विषयाचा समावेश आणि प्रतीक्षा यादीबाबतची नवी पद्धत — या सर्व गोष्टी पालकांनी अर्ज करण्यापूर्वी नीट समजून घेणे आवश्यक आहे.

या लेखात काय वाचाल?

1. महत्त्वाच्या तारखा 2. अर्जासाठी कागदपत्रे 3. पात्रता नियम 4. वयोमर्यादा 5. EVS बदल 6. अंतिम checklist

1. महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत वेळापत्रक

अभ्यासाचे नियोजन करण्यापूर्वी 2027 च्या प्रवेश प्रक्रियेतील अधिकृत तारखा समजून घ्या. कोणत्याही अनधिकृत तारखांवर विश्वास ठेवू नका.

घटना 2027 तारीख / स्थिती बदलांचा सारांश / काय करावे
अर्ज प्रक्रिया सुरू 07 जुलै 2026 अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 ही अंतिम तारीख आहे; वेळेत ऑनलाइन अर्ज पूर्ण करा.
परीक्षेची तारीख 28 नोव्हेंबर 2026 संपूर्ण देशात एकाच दिवशी परीक्षा घेतली जाईल.
निकाल जाहीर होण्याची वेळ मार्च/एप्रिल 2027 सर्व विद्यालयांसाठी या वेळेत निकाल अपेक्षित आहे.

पालकांसाठी टीप: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 07 जुलै 2026 पासून सुरू होत असून 31 जुलै 2026 ही अंतिम तारीख आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे तीन आठवडे मिळणार असल्यामुळे अधिकृत प्रवेश पोर्टल नियमित तपासा आणि लवकरच अर्ज भरा.

2. ऑनलाइन अर्ज भरताना ही कागदपत्रे तयार ठेवा

सायबर कॅफेमध्ये धावपळ किंवा चुका टाळण्यासाठी, ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी केवळ खालील माहिती आणि कागदपत्रे डिजिटल स्वरूपात (JPG फॉरमॅट, साईझ 10 ते 100 KB दरम्यान) तयार ठेवा:

कागदपत्र / माहिती कशासाठी आवश्यक आहे आवश्यकतेचा सारांश
विद्यार्थ्याचा फोटो ऑनलाइन अर्जात अपलोड करण्यासाठी स्पष्ट आणि अलीकडचा डिजिटल पासपोर्ट फोटो (10 ते 100 KB).
पालकांची स्वाक्षरी ऑनलाइन अर्जात अपलोड करण्यासाठी पांढऱ्या कागदावर स्पष्ट सही करून स्कॅन केलेली असावी (10 ते 100 KB).
विद्यार्थ्याची स्वाक्षरी ऑनलाइन अर्जात अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्याची स्वतःची सही स्कॅन केलेली असावी (10 ते 100 KB).
आधार / रहिवासी पुरावा ओळख, पत्ता आणि पात्रता तपासणीसाठी आधार नंबर आवश्यक आहे. आधार नसल्यास, पालकांचा सरकारी रहिवासी पुरावा तात्पुरता अपलोड करावा लागेल.
राज्य, जिल्हा आणि ब्लॉक माहिती योग्य नवोदय विद्यालयासाठी अर्ज करायला विद्यार्थी इयत्ता 5 वी ज्या जिल्ह्यात शिकत आहे, त्याच्याशी जुळणारी माहिती.
APAAR ID आणि PEN नंबर अर्जातील प्राथमिक माहितीसाठी विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती जोडण्यासाठी हे नंबर फायदेशीर आहेत. शाळेतून हे नंबर मिळवा. (अर्जासाठी अनिवार्य नाही, प्रवेशवेळेस लागेल)
शाळेचा तपशील 3री, 4थी, 5वी च्या शाळा विषयी माहिती नाव, मान्यता स्थिती, ग्रामीण/शहरी स्थिती, इ. सुरू आणि उतीर्ण होण्याचा महिना व वर्ष
SC/ST/OBC/ Disability प्रमाणपत्र लागू असल्यास हे अर्जासाठी अनिवार्य नाही, पण निवडी नंतर अर्जाच्या/परीक्षेच्या आधीच्या तारखेच प्रमाणपत्र द्याव लागेल. OBC केंद्रीय यादीतील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

3. पात्रतेच्या नियमात बदल: रहिवासी जिल्हा अत्यंत महत्त्वाचा

समितीने जिल्ह्याशी संबंधित बदलले आहेत, जिल्ह्याच्या सीमेवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटी लवचिकता दिली आहे.

मुद्दा 2026 पूर्वीचा नियम 2027 मधील नवीन बदल बदलांचा सारांश
मूळ नियम विद्यार्थी त्याच जिल्ह्यात राहणारा आणि त्याच जिल्ह्यात 5 वी शिकणारा असावा. विद्यार्थ्याने आपल्या मूळ रहिवासी जिल्ह्याच्या नवोदय शाळेसाठीच अर्ज करावा. अर्ज हा पूर्णपणे पालकांच्या मूळ रहिवासी जिल्ह्याशी जोडला गेला आहे.
शेजारच्या जिल्ह्यातील शाळा परवानगी नव्हती; शाळा आणि घर एकाच जिल्ह्यात असणे बंधनकारक होते. परवानगी आहे, पण इयत्ता 5 वी ची शाळा घरापासून 10 km च्या आत असावी आणि समितीकडून पडताळणी केली जाईल. सीमेवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 km अंतराची सवलत देण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा जिल्हा ज्या जिल्ह्यात विद्यार्थी शिकत होता आणि राहत होता तोच जिल्हा. केवळ मूळ कायदेशीर रहिवासी असलेला जिल्हा. शाळेच्या पत्त्यापेक्षा घराच्या कायदेशीर पत्त्याला आणि रहिवासी पुराव्याला जास्त महत्त्व दिले आहे.

सोपा सल्ला: प्रथम तुमच्या पाल्याचा कायदेशीर रहिवासी जिल्हा कोणता आहे ते तपासा. केवळ त्याच रहिवासी जिल्ह्याशी संबंधित नवोदय शाळेसाठी अर्ज करा.

4. वयोमर्यादेत झालेला बदल

स्मरणशक्तीवर आधारित जन्मतारीख टाकू नका. विद्यार्थ्याची जन्मतारीख जन्म दाखला, आधार कार्ड आणि शाळेच्या रेकॉर्डशी तंतोतंत जुळली पाहिजे.

जन्मतारखेची मर्यादा

01 May 2015 ते 31 July 2017 (दोन्ही तारखा धरून)

इयत्ता 5 वी चे शैक्षणिक वर्ष

2026–27 शैक्षणिक वर्ष

5 वी प्रवेशाची अंतिम तारीख

31 July 2026 पूर्वी प्रवेश घेतलेला असावा

सोपा सल्ला: केवळ अंदाजाने जन्मतारीख भरू नका. अर्ज सबमिट करण्यापूर्वी जन्म दाखला आणि अधिकृत कागदपत्रांवरून तिची खात्री करा.

5. परीक्षेच्या स्वरूपात बदल: परिसर अभ्यास (EVS) चा समावेश

JNVST 2027 मधील हा सर्वात मोठा शैक्षणिक बदल आहे. परीक्षेचे एकूण गुण आणि वेळ तीच राहिली आहे, पण विषयांचे गुण बदलले आहेत.

विषय 2026 पूर्वीचे स्वरूप 2027 मधील नवीन बदल
मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न 20 प्रश्न
परिसर अभ्यास (EVS) विभाग 1 चा भाग नव्हता 20 प्रश्न
अंकगणित चाचणी 20 प्रश्न 20 प्रश्न
भाषा चाचणी 20 प्रश्न 20 प्रश्न
एकूण 80 प्रश्न, 100 गुण 80 प्रश्न, 100 गुण
परीक्षेचा वेळ 2 तास 2 तास

महत्त्वाची टीप: दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी 40 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. या बदलाचा अर्थ असा की विद्यार्थी आता फक्त बुद्धिमत्ता, गणित आणि भाषेचा अभ्यास करून यशस्वी होऊ शकत नाहीत. परिसर अभ्यास (EVS) आता दररोजच्या तयारीचा भाग असणे आवश्यक आहे.

6. मानसिक क्षमता चाचणी ची तयारी

या चाचणीमध्ये प्रश्न कमी झाल्यामुळे, प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देणे आता जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.

मुद्दा 2026 पूर्वीचे स्वरूप 2027 मधील नवीन बदल
चाचणीची रचना 10 भाग, प्रत्येकी 4 प्रश्न 5 भाग, प्रत्येकी 4 प्रश्न
मुख्य भर पूर्ण वेळ फक्त बुद्धिमत्ता व आकृत्यांवर भर. संतुलित अभ्यास: कमी झालेली बुद्धिमत्ता चाचणी आणि सोबत नवीन परिसर अभ्यास (EVS).
समाविष्ट घटक 1. वेगळी आकृती ओळखणे
2. आकृती जुळवणे
3. पॅटर्न पूर्ण करणे
4. आकृती मालिका
5. परस्पर संबंध
6. भौमितिक आकृती पूर्ण करणे
7. आरशातील प्रतिमा
8. कागद दुमडणे
9. अवकाश कल्पना
10. लपलेली आकृती
1. पॅटर्न पूर्ण करणे
2. आकृती मालिका
3. भौमितिक आकृती पूर्ण करणे
4. आरशातील/पाण्यातील प्रतिमा
5. लपलेली आकृती
अभ्यासावरील परिणाम बुद्धिमत्तेच्या सरावावर खूप जास्त वेळ द्यावा लागत होता. बुद्धिमत्ता आणि परिसर अभ्यास (EVS) दोन्हीला समान वेळ द्यावा लागेल.

7. परिसर अभ्यास (EVS): गुण वाढवण्याची नवीन संधी

परिसर अभ्यास (EVS) हा केवळ सामान्य ज्ञान नाही. यामध्ये विज्ञान, समाजशास्त्र आणि पर्यावरण शिक्षणाचा एकत्रित दृष्टिकोन अंतर्भूत आहे. विद्यार्थ्यांची त्यांच्या सभोवतालच्या परिसराविषयीची प्राथमिक जागरूकता तपासणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश आहे.

मुद्दा 2026 पूर्वीचे स्वरूप 2027 मधील नवीन बदल
परीक्षेतील स्थान अशा प्रकारे स्वतंत्र विषय नव्हता. बुद्धिमत्ता चाचणीसोबत 20 परिसर अभ्यास (EVS) प्रश्न समाविष्ट. एकूण 15 बहुपर्यायी प्रश्न आणि 1 उतारा 5 प्रश्नांचा
अभ्यासाचे स्त्रोत प्रामुख्याने बुद्धिमत्ता, गणित आणि भाषेची पुस्तके. इयत्ता 3 री ते 5 वी ची विज्ञान, सामाजिक शास्त्र अभ्यास (EVS) पुस्तके महत्त्वाची.
अभ्यासाची पद्धत फक्त आकृत्या आणि गणिते सोडवण्यावर भर. दैनंदिन विज्ञान, पर्यावरण आणि सामाजिक परिसराची तयारी.

परिसर अभ्यास (EVS) साठी अभ्यासाचे महत्त्वाचे घटक:

घटकांचा गट अभ्यासासाठी अधिकृत उदाहरणे
नैसर्गिक जग वाहतूक, नद्या, पर्वत, जमीन आणि पाण्यावरील वनस्पती व प्राणी, नैसर्गिक आपत्ती, घरांचे/निवाऱ्याचे प्रकार, जलचक्र इत्यादी.
मानवी शरीर अन्न आणि पोषण, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, विशेष ज्ञानेंद्रिये, अंतर्गत संस्थांचे प्राथमिक ज्ञान (जसे की पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसनसंस्था इत्यादी).
दैनंदिन जीवनातील विज्ञान अन्न टिकवण्याच्या पद्धती, जल आणि वायू प्रदूषण, पाणी आणि मातीचे संवर्धन इत्यादी.
सामाजिक परिसर भारतातील सर्वोच्च आणि प्रथम गोष्टी, राज्ये आणि राजधान्या, राष्ट्रीय प्रतीके, विविध भूरूपे, सण, ऋतू, जंगले, पिके, कपडे आणि धागे इत्यादी.

सोपा सल्ला: इयत्ता 3 री, 4 थी आणि 5 वी ची पर्यावरण अभ्यास (EVS) पुस्तके अतिशय काळजीपूर्वक वाचा. या विषयाला केवळ वरवरचे सामान्य ज्ञान समजू नका.

8. अंकगणित अभ्यासक्रमातील अचूक विषय आणि बदल

2026 च्या माहितीपत्रकात दशांश, अपूर्णांकांचे दशांशात रूपांतर, नफा-तोटा आणि आलेख यांसारखे विषय स्पष्टपणे दिले होते. 2027 च्या माहितीपत्रकात अंकगणिताचे 20 प्रश्नच ठेवले आहेत, परंतु दिसणाऱ्या विषयांची यादी बदलली असून त्यात एकक रूपांतरण, दिशा व नकाशा वाचन आणि चित्ररूप माहितीचे विश्लेषण यांचा नव्याने समावेश केला आहे.

मुद्दा 2026 पूर्वीचे स्वरूप 2027 मधील नवीन बदल
अंकगणिताचे प्रश्न 20 20
एकूण दिलेले विषय 12 माहितीत 12 विषय म्हटले आहे, पण प्रत्यक्ष यादी अधिक संक्षिप्त आहे (9 घटकाची आहे)
स्पष्टपणे दिलेले विषय दशांश, अपूर्णांक-दशांश रूपांतरण, नफा-तोटा, आलेख आणि रेषा आलेख एकक रूपांतरण, दिशा आणि नकाशा, तक्ते आणि चित्ररूप माहिती
माहितीचे विश्लेषण स्तंभालेख, आलेख आणि रेषा आलेख स्तंभालेख, तक्ते आणि चित्ररूप माहिती
अभ्यासावरील परिणाम जुना अंकगणित अभ्यासक्रम काही भागात अधिक विस्तृत होता पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेण्यावर आणि प्रत्यक्ष वापरावर जास्त भर.

अधिकृत माहितीपत्रकात “12 topics” असा उल्लेख आहे; मात्र प्रकाशित यादी 9 मुख्य मुद्द्यांमध्ये दिली आहे. या चाचणीचा मुख्य उद्देश उमेदवारांच्या अंकगणितातील मूलभूत क्षमता तपासणे हा आहे. 2027 च्या अधिकृत माहितीपत्रकानुसार, या चाचणीतील सर्व 20 प्रश्न खालील 9 विषयांवर आधारित असतील:

  1. संख्या आणि संख्या प्रणाली (चढता आणि उतरता क्रम, सर्वात जवळची 10/100/1000 संख्या, संख्यांची नावे आणि मूल्य यांच्यासह)
  2. पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया
  3. अवयव आणि गुणक (त्यांच्या गुणधर्मांसह)
  4. अपूर्णांक आणि मूलभूत क्रिया - समान छेद असलेल्या अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी तसेच गुणाकार (भिन्न छेद असलेले अपूर्णांक आणि अपूर्णांक संख्यांचा भागाकार वगळून)
  5. लांबी, वस्तुमान, क्षमता, वेळ, पैसा आणि एकक रूपांतरण इत्यादींचे मोजमाप
  6. संख्यात्मक पदावलींचे सुलभीकरण
  7. परिमिती आणि क्षेत्रफळ - बहुभुजाकृतीची परिमिती, चौरस, आयत आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ (आयताचा एक भाग म्हणून)
  8. कोनांचे प्रकार आणि त्यांचे सोपे उपयोग (दिशा आणि नकाशा वाचनासह)
  9. स्तंभालेख, तक्ते आणि चित्ररूप माहितीचा वापर करून माहितीचे विश्लेषण

महत्त्वाची टीप: यामधील संकल्पना आणि कौशल्ये समजून घेण्यावर व त्यांच्या प्रत्यक्ष वापरावर जास्त भर दिला जाईल. पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेण्यावर आणि त्यांच्या व्यावहारिक उपयोगावर जास्त महत्त्व द्या. 2026 चे घटक सोडू नका. त्याचा ही अभ्यास करा. नवीन स्पष्ट घटकावर अधिक भर द्या.

9. भाषा चाचणी चे स्वरूप

पूर्वीसारखेच नियमित सरावाने पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी भाषा हा अजूनही सर्वात चांगला विषय आहे.

उद्देश

2026 पूर्वीचे स्वरूप: वाचन आणि आकलन

2027 मधील नवीन बदल: वाचन आणि आकलन

परीक्षेचे स्वरूप

2026 पूर्वीचे स्वरूप: 4 उतारे, प्रत्येकी 5 प्रश्न

2027 मधील नवीन बदल: 4 उतारे, प्रत्येकी 5 प्रश्न

प्रश्न आणि गुण

2026 पूर्वीचे स्वरूप: 20 प्रश्न, 25 गुण

2027 मधील नवीन बदल: 20 प्रश्न, 25 गुण

आकलन आणि शब्दसंग्रह सुधारण्यासाठी रोज उतारे वाचणे आवश्यक आहे. उताऱ्याचा मुख्य विचार, विरुद्धार्थी शब्द आणि तर्कावर आधारित उत्तरे शोधण्यावर भर द्या.

10. कागदपत्रांच्या नियमांमध्ये सुधारणा

2027 च्या माहितीपत्रकात कागदपत्रांबद्दल अत्यंत कडक भाषा वापरली आहे. निवड झाल्यानंतर कागदपत्रे बनवून घेऊ, हा धोका अजिबात पत्करू नका.

सर्वसाधारण प्रमाणपत्रे

2026 पूर्वीचा नियम: अनेकदा निवड झाल्यानंतर वेळ दिला जात होता.

2027 मधील नवीन बदल: अर्ज करतानाच सर्व दाव्यांची वैध आणि कायदेशीर प्रमाणपत्रे परीक्षेच्या/अर्जाच्या पूर्वीची असणे बंधनकारक.

  • प्रमाणपत्रांच्या तारखा (अत्यंत महत्त्वाचे): जन्म दाखला, रहिवासी पुरावा, पात्रता प्रमाणपत्रे आणि केंद्रीय ओबीसी प्रमाणपत्र हे परीक्षेच्या/अर्जाच्या तारखेपूर्वीचेच असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • अर्जातील चुका चालणार नाहीत: अर्ज सबमिट केल्यानंतर सर्व माहिती अंतिम मानली जाईल. काही निवडक बाबींसाठी correction window उपलब्ध होऊ शकते; मात्र त्यावर अवलंबून न राहता अर्ज भरतानाच सर्व माहिती अचूक भरा.
  • केंद्रीय ओबीसी प्रमाणपत्र: परीक्षेच्या/अर्जाच्या तारखेपूर्वीचेच केंद्रीय यादीतील प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. जर वेळेवर काढलेले वैध प्रमाणपत्र नसेल, तर उमेदवाराने केवळ खुला (Unreserved) प्रवर्ग निवडावा.
  • सरकारी पोर्टल पडताळणी: समिती आता शाळेचा डेटा सरकारी युडायस (UDISE) पोर्टलशी तपासेल. जर शाळेची माहिती नसेल किंवा तफावत आढळली, तर पालकांना सक्षम अधिकाऱ्याकडून ग्रामीण भागातील प्रमाणपत्राचा स्वतंत्र पुरावा द्यावा लागेल.
  • दिव्यांग प्रमाणपत्र: वैध UDID प्रमाणपत्र किंवा सरकारी रुग्णालयाचे अधिकृत प्रमाणपत्रच बंधनकारक (अर्जावेळी अनिवार्य नाही)

11. मोठा बदल: 2027 मध्ये प्रतीक्षा यादी नाही (Waiting List)

निकालानंतरच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करून ती अधिक वेगवान आणि ऑनलाइन करण्यात आली आहे.

मुद्दा 2026 पूर्वीचा नियम 2027 मधील नवीन बदल
निकाल जाहीर होण्याची वेळ March 2026 च्या आसपास. सर्व विद्यालयांसाठी March/April 2027 मध्ये निकाल अपेक्षित.
संपर्क पद्धत फोन कॉल आणि स्पीड पोस्टने माहिती दिली जात होती. स्पीड पोस्ट आणि ऑनलाइन पोर्टलवरील अपडेट्स.
प्रतीक्षा यादी नियम काही महिन्यांच्या अंतराने 2 प्रतीक्षा याद्या जाहीर होत होत्या. कोणतीही प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार नाही.
रिक्त जागा भरणे प्रतीक्षा यादीतून मॅन्युअली जागा भरल्या जात होत्या. जागा रिक्त झाल्यास पोर्टलवरून पुढील पात्र विद्यार्थी आपोआप निवडला जाईल.
प्रवेशाची अंतिम तारीख 31 December 2026 31 August 2027

2027 साठी स्वतंत्र प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार नाही. रिक्त जागा निर्माण झाल्यास संबंधित प्रवर्ग/कोट्यातील पुढील पात्र विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश पोर्टलवर निवडला जाईल. प्रवेश प्रक्रिया 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पूर्ण केली जाणार असल्यामुळे कागदपत्रे आधीच तयार ठेवणे आवश्यक आहे.

12. निवड झाल्यानंतर (प्रवेशाच्या वेळी) जमा करायची मूळ कागदपत्रे

विद्यार्थ्याची तात्पुरती निवड झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी पालकांना खालील सर्व मूळ कागदपत्रे शाळेत जमा करावी लागतील:

  1. जन्मतारखेचा पुरावा: परीक्षेच्या/अर्जाच्या तारखेपूर्वीचा सरकारी जन्म दाखला.
  2. पात्रतेचे पुरावे: सर्व आवश्यक प्रमाणपत्रे अर्जच्या/परीक्षेच्या तारखेपूर्वीची असावीत.
  3. रहिवासी पुरावा: पालकांच्या नावावरील त्याच जिल्ह्याचा वैध रहिवासी पुरावा (अर्जाच्या तारखेपूर्वीचा).
  4. आधार कार्डची प्रत: विद्यार्थ्याचे आधार कार्ड प्रवेशाच्या वेळी अनिवार्य आहे.
  5. मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र: इयत्ता 3 री, 4 थी आणि 5 वी चा अभ्यास आणि शाळा ग्रामीण/शहरी असल्याचे प्रमाणित करणारे पत्र.
  6. ग्रामीण भागाचा पुरावा (तफावत आढळल्यास): शाळेची माहिती युडायस (UDISE) पोर्टलवर नसल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
  7. केंद्रीय ओबीसी प्रमाणपत्र: परीक्षेच्या/अर्जाच्या करण्यापूर्वीच केंद्रीय यादीतील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  8. स्थलांतराचे हमीपत्र (Undertaking for Migration).
  9. शाळा सोडल्याचा दाखला (TC): प्रवेश निश्चित करताना मूळ शाळेचा दाखला.
  10. इतर प्रमाणपत्रे (लागू असल्यास): दिव्यांग प्रमाणपत्र (UDID), जातीचे प्रमाणपत्र (SC/ST).

JNVST 2027 साठी पालकांची अंतिम यादी

1. अर्ज करण्यापूर्वी

विद्यार्थ्याचे वय, रहिवासी जिल्हा, शाळेचा जिल्हा आणि ग्रामीण/शहरी गट तपासा.

2. अर्ज भरताना

विद्यार्थ्याचे नाव, आधार नंबर, आणि जात प्रवर्ग यांचे स्पेलिंग दोनदा तपासा. अर्जातील चुका टाळा.

3. परीक्षेच्या तयारीदरम्यान

अभ्यासाचे नियोजन करा: गणित, बुद्धिमत्ता, भाषा आणि पर्यावरण अभ्यास (EVS) सर्वांचा एकत्रित अभ्यास करा.

4. निकालानंतर

अधिकृत पोर्टल नियमित तपासा. प्रतीक्षा यादीची वाट पाहू नका.

5. प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी

पडताळणीसाठी सर्व मूळ प्रमाणपत्रे हातात तयार ठेवा.

निष्कर्ष

JNVST 2027 मध्ये EVS विषयाचा समावेश, जिल्हा नियमातील बदल आणि कागदपत्रांची अचूक पडताळणी यामुळे पालकांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. योग्य वेळी अर्ज, अचूक कागदपत्रे आणि बुद्धिमत्ता, गणित, भाषा व EVS यांचा संतुलित अभ्यास — या गोष्टींवर लक्ष दिल्यास तुमच्या पाल्याची नवोदय प्रवेशासाठीची तयारी अधिक मजबूत होईल. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील अद्ययावत माहिती नक्की तपासा.

- प्रभाकर गुंड, गणित प्लस